उपोषणकर्ते डॉ. रमेश शिंदे यांची प्रकृती चिंताजनक; उपचार नाकारल्याने जीवितास धोका

उपोषणकर्ते डॉ. रमेश शिंदे यांची प्रकृती चिंताजनक; उपचार नाकारल्याने जीवितास धोका
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
10 एप्रिल 2026
हिंगोली : कयाधू नदी भूमिगत वळविण्याच्या कामाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात उपोषणाला बसलेले शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित डॉक्टरांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे.
उपोषणाचा आज चौथा दिवस असून, डॉ. शिंदे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असून उपचार न घेतल्यास गंभीर परिणाम संभवतात. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, कयाधू नदीवरील बोगदा प्रकल्पाचे काम आंदोलनकर्त्यांनी बंद पाडले असून कोणत्याही परिस्थितीत हे काम सुरू होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने जबरदस्तीने काम सुरू केल्यास आंदोलनकर्ते बोगद्यात उतरून आडवे झोपण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आज उपोषण स्थळी उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता (पेनगंगा प्रकल्प, बाळापूर), तसेच पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन डॉ. शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्यवस्थित संवाद साधणे कठीण जात होते. तरीही, “बोगदा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, जीव गेला तरी चालेल,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
उपोषण स्थळी त्यांच्या आई मुक्ताबाई शिंदे यांनीही भेट दिली. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे.
उद्या, दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी हिंगोली तालुक्यातील उमरा, हनवतखेडा, चांगेफळ तसेच सेनगाव तालुक्यातील कारेगाव, रिधोरा, नागा शिंदे या सहा गावांतील शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, याच दिवशी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत उपोषण स्थळी ह.भ.प. राजू महाराज नागरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
सदर आंदोलन खांबाळ (ता. जि. हिंगोली) येथील रेल्वे पटरीलगत सुरू असून परिस्थिती लक्षात घेता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Post a Comment

أحدث أقدم