नाशिक येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण भेट

नाशिक येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण भेट

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
23 एप्रिल 2026
नाशिक : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची नाशिक येथे पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पत्रकारांसाठी गृह संकुल उभारणीच्या मागणीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने गृह संकुलासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली तसेच संबंधित कागदपत्रांची पूर्तता झाल्याबाबतही पालकमंत्र्यांना अवगत करण्यात आले. या विषयावर सकारात्मक भूमिका घेत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी सांगितले की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीत पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आवश्यक असल्यास मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन पत्रकार गृह संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस पत्रकार वेल्फेअर सोसायटी हिंगोलीचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव सुनील पाठक, समिती सदस्य प्रकाश इंगोले आणि सदस्य गजानन मगर उपस्थित होते. या सर्वांनी एकमुखाने पत्रकारांसाठी स्वतंत्र गृह संकुल उभारण्याची गरज अधोरेखित केली.
पत्रकारांच्या निवासाच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलली जात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या काळात या प्रश्नाला ठोस दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم