आपलं गाव आरोग्य संपन्न गाव अशी ओळख निर्माण झाली पाहिजे – सीईओ विवेक गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २३ : औंढा नागनाथ येथे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पंचायत समिती औंढा नागनाथ येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गट विकास अधिकारी गोपाल कल्हारे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात विवेक गायकवाड यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रथम स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर गावाच्या आरोग्याची जबाबदारी सर्वांनी सामूहिकपणे स्वीकारली पाहिजे,” असा संदेश त्यांनी आशा कार्यकर्त्यांना दिला. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
अभियानातील ५९ निर्देशांकांची पूर्तता करून पूर्ण गुण मिळविण्यावर भर देत त्यांनी सांगितले की, “मेहनत आणि चांगले कार्य केल्यास त्याचे फळ निश्चित मिळते. आपलं गाव ‘आरोग्य संपन्न गाव’ म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे.” उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार असून, काम केल्याचे समाधानही मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
अभियानातील पुरस्कार संरचना पुढीलप्रमाणे आहे :
ग्रामपंचायत स्तरावर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी रुपये; विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख, तृतीय ५० लाख रुपये; तर जिल्हास्तरावर प्रथम २५ लाख, द्वितीय २० लाख, तृतीय १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरावर प्रथम २५ लाख व जिल्हास्तरावर प्रथम ५ लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरावर प्रथम ५० लाख व जिल्हास्तरावर प्रथम १० लाख रुपये, तसेच ग्रामीण रुग्णालयांना राज्यस्तरावर प्रथम ७५ लाख रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी अभियानाची माहिती देताना गावपातळीवर जनजागृती वाढवून उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली, तर आभार प्रदर्शन गोपाल कल्हारे यांनी केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र गोलाइतकर यांनी केले.
या कार्यशाळेला पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचारी, ग्राम विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
إرسال تعليق