नागरिकांना सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यावर भर
हिंगोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक
मुख्य सचिव राजेश अग्रवाल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभाग व राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव अतुल पाटणे, विविध विभागीय आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डिजिटल समन्वय आणि एआय आधारित यंत्रणेकडे वाटचाल
मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले की, पासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासन विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढवत आहे. भविष्यात निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईल, अशी प्रणाली विकसित करण्यात येत आहे.
तसेच जी2जी, जी2सी आणि जी2बी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी पारंपरिक एजंट प्रणालीत बदल करून डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘डिजी लॉकर’ आणि ‘गोल्डन डाटा’च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा प्रोफाइल तयार करून त्याला आवश्यक शासकीय सेवा आपोआप उपलब्ध करून देण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
एआय एजंट्सद्वारे सेवा वितरण सुलभ होणार
भविष्यात नागरिकांना वेगवेगळे अॅप वापरण्याची गरज भासणार नसून एआय आधारित एजंट्स नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्या गरजा ओळखून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. शासन या संदर्भात विविध कंपन्यांसोबत काम करत असून येत्या काही महिन्यांत ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचे संस्थात्मक रूपांतर आवश्यक
मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण यंत्रणेचा भाग व्हावेत यासाठी त्यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात यशस्वी ठरलेले उपक्रम संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
सेवा वितरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव
राज्यात सेवा वितरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून ९१.४१ टक्के सेवा निर्धारित कालावधीत देण्यात आल्या. हिंगोली जिल्हा ९०.६० टक्के सेवांसह द्वितीय क्रमांकावर राहिला, तर अहिल्यानगर जिल्ह्याने ९०.५० टक्के सेवांसह तृतीय स्थान मिळवले. बीड जिल्ह्यानेही ९०.१३ टक्के सेवांसह उल्लेखनीय कामगिरी केली.
अधिकाऱ्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा सन्मान
कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही गौरव करण्यात आला. डिजिटल ई-लॉक, जीआयएस आधारित ई-मोजणी, एआय नकाशा प्रक्रिया, पीएमसी केअर अॅप, व्हॉट्सअॅप चॅटबॉट आदी उपक्रमांमुळे सेवा वितरण अधिक वेगवान व प्रभावी झाल्याचे नमूद करण्यात आले.
मुंबई उपनगर, ठाणे, बुलढाणा, नंदुरबार, यवतमाळ, जालना व अकोला येथील अधिकाऱ्यांनीही विविध डिजिटल व प्रशासनिक सुधारणा करून सेवा अधिक सक्षम केल्या असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल पाटणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी केले. यावेळी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले.
إرسال تعليق