५३ लाख ९५ हजार अपहार; सोनल जावळेवर (कनिष्ठ सहायकावर) गुन्हा दाखल
जिल्हा परिषदेत खळबळ;
शहर पोलीस ठाण्यात नोंद
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 एप्रिल 2026
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील आर्थिक अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तब्बल ५३ लाख ९५ हजार ६९८ रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी लिपिक सोनल चंद्रकांत जावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनल जावळे या पशुसंवर्धन विभागात कनिष्ठ सहाय्यक (लेखा) म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी १ ऑक्टोबर २०१५ ते ११ जून २०२५ या कालावधीत अत्यंत शिताफीने बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे निधी वळविल्याचा आरोप आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने विविध धनादेशांवर बनावट स्वाक्षऱ्या करून सेवाशुल्काच्या सुमारे ३९ लाख ८० हजार ९४३ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात जमा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
तसेच वेतन व भत्ते कपातीचे १२ लाख ३ हजार ७०९ रुपये आणि पुरवठादारांच्या जीएसटी व टीडीएसच्या २ लाख ११ हजार ४६ रुपयांचाही अपहार करण्यात आला. या सर्व रकमा वेगवेगळ्या धनादेशांद्वारे वळवून एकूण ५३ लाख ९५ हजार ६९८ रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सुमारे २९ लाख ९९ हजार ७५५ रुपये परत जमा करण्यात आल्याचे समोर आले असले, तरी उर्वरित रकमेचा शोध अद्याप सुरू आहे. या गैरव्यवहारामुळे विभागातील आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा आणि आर्थिक नियंत्रण प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपासात आणखी अनियमितता उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
إرسال تعليق