डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपळखुट्टा येथे भव्य महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 एप्रिल 2026
हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुट्टा येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभूषण प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी हा जयंती उत्सव साजरा होणार असून, परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महोत्सवाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता धम्म ध्वजारोहणाने होणार असून, हा कार्यक्रम मा. आ. श्री. संतोष बांगर यांच्या हस्ते पार पडणार आहे. दुपारी ३ ते ७ या वेळेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत विविध गावांतील लेझीम पथकांचा सहभाग असणार आहे, ज्यामध्ये इसापुर, अंधेरी, पारडा, समगा, पिंप्री, गंगानगर, सावरखेडा, खानापुर, भोगांव, पिंपरखेड आणि नागझरी येथील पथकांचा समावेश आहे.
संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता संघर्ष कला पथक, आमनवाडी (जि. वाशिम) तसेच कवी-गायक रवि जोगदंड यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली वकिल संघाचे माजी अध्यक्ष सुनिल भुक्तार हे असणार आहेत. यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यामध्ये मिलिंद उबाळे, रवि वाडे, गोपाल दुबे, फकिरराव मुंढे, शंकरराव घुगे, पांडुरंग जगताप, विठ्ठल चोतमल, पुंजाजी गताडे, राजू ठोके, मनोहर भोकरे, शिवनंदा वाघमारे, राजू इंगोले, सिद्धार्थ गायकवाड, सचिन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, केशवराव नाईक, दिलीप भिसे, वाय.वी. मुळे, सुनिल टापरे, दिलीप साठे, महेंद्र कांचळे, पंजाब वाढवे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
या जयंती महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, पिंपळखुट्टा तसेच समता सैनिक दल व रमाई महिला मंडळ यांनी विशेष पुढाकार घेतला असून, गावातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.
सर्व भीमसैनिक, उपासक-उपासिका तसेच गावकरी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जयंती महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
إرسال تعليق