जल जीवन व घरकुल योजनांचा आढावा; पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी प्रशासन सज्ज सीईओ गायकवाड

जल जीवन व घरकुल योजनांचा आढावा; पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी प्रशासन सज्ज
सीईओ गायकवाड 

हिंगोली (दि. २५): जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन ‘जल जीवन मिशन’, घरकुल योजना तसेच एकल महिला व बालकल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जल जीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करून गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
सेनगाव येथील सातारकर महाराज सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, गट विकास अधिकारी श्री. होळकर, सहाय्यक गट विकास अधिकारी माधव कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे उपस्थित होते.
गायकवाड यांनी स्पष्ट केले की, गावातून कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे. तक्रारी गावपातळीवरच सोडविण्याचा प्रयत्न करावा तसेच चांगल्या कामाला प्रोत्साहन देत सर्वांच्या सहभागातून विकास साधावा. गावकऱ्यांना कायमस्वरूपी आणि शाश्वत पाणीपुरवठा कसा करता येईल यावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले.
महिलांची पायपीट थांबवणे गरजेचे
पाणीटंचाईचा सामाजिक परिणाम मांडताना त्यांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी दररोज ३ ते ४ तास खर्च करावे लागतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून रोजगाराच्या संधींवरही परिणाम होत आहे. नागरिकांना शुद्ध व वेळेवर पाणी मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महत्त्वाचे निर्देश:
‘ड्राय सोर्स’ (कोरडे पडलेले पाणीस्त्रोत) “जल तारा” उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करावेत
सर्व कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत गावनकाशे तयार करून सर्व पाणीस्त्रोतांचे रेखांकन करावे
संभाव्य पाणीटंचाईसंदर्भातील उपाययोजना अद्ययावत ठेवाव्यात
घरकुल व सामाजिक योजनांवर भर
घरकुल योजना विहित मुदतीत पूर्ण करून लाभार्थ्यांना वेळेत लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले. बालसंगोपन योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी दरमहा २२५० रुपये देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, तसेच एकल महिलांसाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याशिवाय कळमनुरी व औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत पाणीटंचाईबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली.
एकूणच, जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त केला असून नागरिकांना शाश्वत सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم