महाराष्ट्रातील 53 पोलीस घटकांमध्ये हिंगोली जिल्हा CCTNS कामगिरीत अव्वल201 पैकी 201 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक

महाराष्ट्रातील 53 पोलीस घटकांमध्ये हिंगोली जिल्हा CCTNS कामगिरीत अव्वल
201 पैकी 201 गुण मिळवत  राज्यात प्रथम क्रमांक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 14 मे 2026 :
महाराष्ट्र राज्यातील 53 पोलीस घटकांच्या CCTNS (Crime and Criminal Tracking Network & Systems) कामगिरीच्या मूल्यमापनात हिंगोली पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. फेब्रुवारी 2026 महिन्याच्या आढाव्यात हिंगोली जिल्ह्याला 201 पैकी 201 गुण प्राप्त झाले असून जिल्ह्याने 100 टक्के कामगिरीची नोंद केली आहे.
CCTNS ही कार्यप्रणाली महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून कार्यान्वित असून, पोलीस ठाण्यांतील सर्व कामकाज डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. तक्रार नोंदविण्यापासून गुन्ह्याच्या तपासाची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया CCTNS द्वारे करण्यात येते. आरोपींचा पूर्वइतिहास पडताळणी तसेच प्रतिबंधक कारवायांसाठीही ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज प्रभावीपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. तर CCTNS नोडल अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे संपूर्ण कामकाजाचे समन्वयन पाहत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात CCTNS कामकाजासाठी पर्यवेक्षक अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर महिन्याला CCTNS शाखा, हिंगोली येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पांडुरंग हमाणे, पोलीस अंमलदार राहुल परमेश्वर तडकसे आणि महिला पोलीस अंमलदार पूजा सखाराम जाधव यांच्या माध्यमातून सर्व संबंधितांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते.
या प्रशिक्षणामध्ये CCTNS सोबतच ICJS, ITSSO, Crime-Mac यांसारख्या विविध पोर्टल्सचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते. प्रणालीशी संबंधित तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवून सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरळीत ठेवण्यात येते.
गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने दर महिन्याला राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या CCTNS कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये उत्कृष्ट समन्वय, वेळेत डेटा नोंदणी आणि तपासाची अचूक माहिती अद्ययावत केल्यामुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशाने 
या यशामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, CCTNS देखरेख अधिकारी आणि पर्यवेक्षक अंमलदार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
हिंगोली पोलीस दलाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याच्या डिजिटल पोलीसिंग व्यवस्थेची राज्यभर दखल घेतली जात असून, भविष्यातही नागरिकाभिमुख व तंत्रज्ञानाधारित सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم