हिंगोली-औंढा नागनाथ रोडवर भीषण अपघात : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी
हिंगोली, दि. 14 मे 2026
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील लिंबाळा मक्ता येथील बापुजी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्तीक विठ्ठलराव कान्हे (वय 22, रा. पिंप्री कुंडकर, ता. औंढा नागनाथ) हे आपल्या मित्रासह दुचाकी क्रमांक एमएच 38 एएफ 8578 वरून हिंगोली येथून गावाकडे जात होते. मंगळवारी रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास हिंगोली-औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता येथील बापुजी ढाब्याजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या एमएच 20 ईएल 2460 क्रमांकाच्या बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील कुंडलीक पंडितराव कुंडकर (वय 31, रा. पिंप्री कुंडकर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी कार्तीक कान्हे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
बस चालकाने वाहन भरधाव वेगात तसेच निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. त्यावरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0315/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(1), 281, 125 (अ), 125 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने मृत व्यक्तीच्या अंत्यविधी व धार्मिक कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दिल्याने गुन्हा नोंदविण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली .सुधीर ढेंबरे करीत आहेत.
إرسال تعليق