हिंगोलीतील समीक्षा पुंडगेची दहावीमध्ये चमकदार कामगिरी
95 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08मे 2026
हिंगोली प्रतिनिधी :
हिंगोली येथील एका अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी कु. समीक्षा मिलिंद पुंडगे हिने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवत आपल्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समीक्षाचे वडील मिलिंद पुंडगे हे वेल्डिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी आपल्या दोन मुलींना चांगले शिक्षण देण्याचा निर्धार कायम ठेवला. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. त्या मेहनतीचे फळ आज समीक्षा हिने आपल्या उज्ज्वल यशातून मिळवून दिले आहे.
समीक्षाने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेत प्रथम येत तिने आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या यशाबद्दल मनीषा वाढवे, प्रज्ञा शिरसाट, धम्मदीक्षा खंदारे, प्रजावती वाढवे, सुजाता पुंडगे, दिपाली आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. तसेच अनेक नातेवाईक, मित्रपरिवार व शुभेच्छुकांनी फोनद्वारे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“भविष्यात मोठे अधिकारी बनून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,” अशा भावना व्यक्त करत अनेकांनी समीक्षा पुंडगेला पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.
समीक्षाच्या यशामुळे गरीब परिस्थितीतही मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे।
إرسال تعليق