अवैध वाळू वाहतूक प्रकरणी हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; टिप्पर, वाळू मोबाईलसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्तउपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; टिप्पर, वाळू  मोबाईलसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. १७ मे २०२६ : हिंगोली शहर पोलिसांनी अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी चौक येथील अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर उत्तरेस सुमारे ५०० मीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे एमएच ३८ एक्स ४५३६ क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या टिप्परमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणी स्वप्रील केशव सरकटे (वय २१, रा. मावरखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) व साजीबखान युसुफखान पठाण (रा. पेन्शनपुरी, हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा टिप्पर, दोन ब्रास वाळू अंदाजे १० हजार रुपये किंमतीची तसेच ७ हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण १५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७)(८) तसेच खान व खनिज अधिनियम १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही फिर्याद पोलीस उपनिरीक्षक नानाराव भाऊराव पोले यांनी दिली असून पुढील तपास पोह एम. ए. शेख हे करीत आहेत. दरम्यान आरोपी क्रमांक १ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

أحدث أقدم