पोलीस उपविभागीय पथकाची मोठी कारवाई : ६५ हजारांचा अवैध देशी दारू साठा जप्ततीन आरोपींवर गुन्हा दाखलdysp कुंदन कुमार वाघमारे

पोलीस उपविभागीय पथकाची मोठी कारवाई : ६५ हजारांचा अवैध देशी दारू साठा जप्त
तीन आरोपींवर  गुन्हा दाखल
dysp कुंदन कुमार वाघमारे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. १५ मे २०२६ :
हिंगोली शहर उपविभागीय पोलीस पथकाने अवैध देशी दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मे रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास हिंगोली–कळमनुरी रोडवरील बंजारा मटन शॉप समोर, कारवाडी पूर्वेस अंदाजे सहा किलोमीटर अंतरावरील बिट क्रमांक ०२ मध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय पथकाने सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान तीन बॉक्समध्ये प्रत्येकी ४८ नग असे एकूण १४४ देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ काचेच्या १८० एमएलच्या बाटल्या, किंमत ११ हजार ५२० रुपये तसेच एका बॉक्समध्ये १०० नग ‘भिंगरी संत्रा’ प्लास्टिकच्या ९० एमएलच्या बाटल्या, किंमत ४ हजार रुपये असा एकूण १५ हजार ५२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा फॅशन कंपनीची एमएच ३८ वाय ३८९० क्रमांकाची मोटारसायकल, किंमत ५० हजार रुपये, पोलिसांनी ताब्यात घेतली. अशा प्रकारे एकूण ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सत्यम नरसिंह देशमुख (वय २७), अरुण विजयराव डहाळे (वय ४३, दोघे रा. शिवाजीनगर, हिंगोली) तसेच शुभम कदम (रा. हिंगोली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा क्रमांक ३२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नानाराव भाऊराव पोले यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. खोडवे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم