पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांना पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते सन्मानपत्र
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 मे 2026
हिंगोली : हिंगोली पोलीस दलातील हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांना महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
सन 2025-26 या कालावधीत श्रीदेवी वगे यांनी महिलांशी संबंधित एकूण 21 गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने, कायदेशीर चौकटीत आणि तत्परतेने तपास पूर्ण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
श्रीदेवी वगे यांनी हिंगोली शहर पोलीस स्टेशन, कळमनुरी शहर पोलीस स्टेशन, बाळापूर पोलीस स्टेशन तसेच सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील महिलांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करून अनेक प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्यामकुमार डोंगरे यांनी वेळोवेळी कायद्याबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्यामुळे श्रीदेवी वगे यांनी आपल्या सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावत आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक रिवॉर्ड प्राप्त केले आहेत.
श्रीदेवी वगे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सुरक्षेसाठी प्रभावी तपास, तत्पर कार्यपद्धती आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे श्रीदेवी वगे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
إرسال تعليق