हिंगोलीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; 10.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात. पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर

हिंगोलीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; 10.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात
 पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 30 जून : हिंगोली शहर पोलिसांनी अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तिसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या टिपर (क्र. एमएच-28 बीए-3535) मधून परवानगीशिवाय पाच ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी गोपाल साहेबराव राठोड (वय 25, रा. ब्राम्हणवाडा, ता. औढा नागनाथ), कपील रामराव शेवाळे (वय 42, रा. गंगानगर, हिंगोली) आणि गजानन प्रल्हाद मोरे (रा. माळीपुरा, लोणार, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी क्रमांक 3 यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक 1 व 2 हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक व विक्री करण्यासाठी नेत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत 10 लाख रुपये किमतीचा टिपर आणि 25 हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू, असा एकूण 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 48(7) व 48(8) आणि खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, 1957 मधील कलम 4 व 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्याद पोलीस शिपाई गणेश  लेकुळे यांनी दिली असून आरोपी क्रमांक 1 व 2 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم