वीज पडून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाखांची आर्थिक मदत
आ. संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण; आईच्या डोळ्यांत अश्रू अनावर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 जून 2026
ता. कळमनुरी (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथे जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या दुर्दैवी वीज पडण्याच्या घटनेत आनंद नागोराव जाधव (वय १५) या मुलाचा मृत्यू झाला होता, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. या घटनेतील मृत मुलाच्या कुटुंबीयांना शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, या मदतीचा धनादेश आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
धनादेश स्वीकारताना मृत आनंदच्या आईच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. उपस्थितांनाही हा क्षण भावूक करणारा ठरला. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना युवा नेते शेवाळा, माजी सरपंच अभय पाटील सावंत, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुत्ते, तहसीलदार जीवकुमार कांबळे, कळमनुरी नगराध्यक्ष प्रतिनिधी आर. आर. पाटील, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुवर्णा गाभणे, माजी पंचायत समिती सदस्य संजय मंदाडे, बाळू पाटील बेंद्रे, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम, विशाल पतंगे येलकीकर, महसूल सहाय्यक रविंद्रकुमार मस्के तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाकडून मिळालेली ही आर्थिक मदत दुःखाची भरपाई करू शकत नसली, तरी संकटग्रस्त कुटुंबाला आधार देणारी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मृत आनंद जाधवच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
إرسال تعليق