मस्तानशहा नगर येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ९ जून : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) च्या १० वर्षपूर्ती निमित्त शहरातील आरोग्य केंद्र, मस्तानशहा नगर येथे आज विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आयोजित या विशेष शिबिरामध्ये गरोदर मातांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषतः जोखीमग्रस्त (हाय रिस्क) गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा, उपचार व तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले.
शिबिरादरम्यान सर्व गर्भवती मातांची हिमोग्लोबिन (एचबी), रक्तातील साखरेची पातळी, एचआयव्ही चाचणी, रक्तदाब, वजन तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता आणि सुरक्षित मातृत्वासाठी आवश्यक बाबींबाबत सविस्तर समुपदेशन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे गर्भवती महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होत असून माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप आंधळे, श्री. रोडे, पंजाब गायकवाड, गणेश ठोके, शेख इब्राहिम, अमाई नरवडे, श्रीमती प्रियंका राठोड, श्रीमती कल्पना कुठे, श्रीमती आरती घोषीर, सुनिता सुपलकर, स्वाती कांबळे तसेच आशा वर्कर्स यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आरोग्य शिबिराला परिसरातील गर्भवती महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती करण्यास या उपक्रमाची मोलाची मदत झाली.
إرسال تعليق