हिंगोली वाहतूक शाखेची विशेष मोहीम : नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई
हिंगोली, प्रतिनिधी :
हिंगोली शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या वतीने विशेष धरपकड मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक शेख गफार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौक व प्रमुख मार्गांवर तपासणी नाके उभारून वाहनांची सखोल तपासणी केली. यामध्ये नंबर प्लेट नसलेली वाहने, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे चालक, फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे पालन करून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, वैध कागदपत्रे बाळगावीत तसेच वाहतुकीचे नियम मोडू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कारवाईत वाहतूक पोलीस शिवाजीराव पारसकर, सुखदेव जाधव, महिला पोलीस मीरा सोनपावले, होमगार्ड शंकर अवचार देवानंद बनसोडे, दत्ता हेंद्रे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. संबंधित पथकाने दिवसभर तपासणी मोहीम राबवून अनेक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
वाहतूक शाखेकडून पुढील काळातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق