पारडा शिवारात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ
दोन दिवसांपूर्वी घटना घडल्याचा अंदाज; घातपाताचा संशय, शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली), दि. २० जून : हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारात एका वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. शेतातील आखाड्यावर वास्तव्यास असलेल्या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत मृतांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम देवबा वाघमारे आणि त्यांची पत्नी कलावती बळीराम वाघमारे हे पारडा शिवारातील माळालगत असलेल्या सुमारे १२ एकर शेतात आखाड्यावर झोपडी बांधून अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. शनिवारी (दि. २०) दुपारी त्यांचा १५ वर्षीय नातू शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याला आजी-आजोबांचे मृतदेह दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्याने तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बासंबा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहण, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना dysp कुंदन कुमार वाघमारे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे पोलीस उपनिरीक्षक नानाराव पोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात बळीराम वाघमारे यांचा मृतदेह झोपडीतील बाजेवर आढळून आला, तर कलावती वाघमारे यांचा मृतदेह शेतातील काही अंतरावर पडलेला होता. दोघांच्याही डोक्यावर व गळ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. तसेच मृतदेह काळे पडलेल्या अवस्थेत असल्याने घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घातपात की वन्यप्राण्याचा हल्ला?
घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मृतांच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता घातपाताचा संशय बळावत असला, तरी एखाद्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळेही ही घटना घडली असावी का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्यासह वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
शवविच्छेदन अहवालानंतर उलगडा
दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर या प्रकरणाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मयत बळीराम व कलावती वाघमारे यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू आणि नात असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या रहस्यमय मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे.
إرسال تعليق