वटपौर्णिमेच्या औचित्याने जिल्हा परिषद परिसरात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते वडासह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड



वटपौर्णिमेच्या औचित्याने जिल्हा परिषद परिसरात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते वडासह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड

हिंगोली, दि. २९ जून : वटपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद प्रशासकीय संकुल परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या शुभहस्ते वडाच्या झाडासह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. या दिवसाचे औचित्य साधून पारंपरिक पूजेसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी अधोरेखित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने हा उपक्रम राबविला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून हरित वसुंधरेच्या संवर्धनाचा संकल्प केला.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत तसेच प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितांनी वृक्षारोपण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड ही प्रभावी चळवळ बनावी आणि प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم