हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न; पहिल्याच दिवशी 95.32 टक्के बालकांना पोलिओ डोस
विवेक गायकवाड
सीईओ
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 जून 2026
हिंगोली, दि. 29 जून : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 28 जून) हिंगोली जिल्ह्यात ‘0 ते 5’ वर्षे वयोगटातील बालकांसाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 95.32 टक्के उद्दिष्ट पूर्ण करत 1 लाख 23 हजार 956 अपेक्षित बालकांपैकी तब्बल 1 लाख 19 हजार 607 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात एकूण 1202 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. तसेच दुर्गम भाग, शेतमळे आणि प्रवासात असलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करत 97 मोबाईल पथके आणि 74 ट्रान्झिट पथके कार्यरत ठेवली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बालकांचे लसीकरण पहिल्याच दिवशी पूर्ण होऊ शकले.
पहिल्या दिवशी विविध कारणांमुळे लसीकरण केंद्रावर येऊ न शकलेल्या उर्वरित बालकांसाठी पुढील तीन दिवस आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन विशेष फॉलो-अप मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल आणि एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी दिली.
ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. याशिवाय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, राज्य परिवहन महामंडळ (एसटी), नगर परिषद तसेच विविध शासकीय यंत्रणांनीही मोलाचे सहकार्य केले.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उर्वरित फॉलो-अप मोहिमेदरम्यान आपल्या परिसरात येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करून प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे.
إرسال تعليق