परभणी-हिंगोली विधान परिषदेत रंगली काट्याची लढत!
‘नावंदर विरुद्ध खान’ थेट सामना; देशमुखांच्या उमेदवारीची राजकीय वर्तुळात चर्चा
सुनील पाठक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 जून 2026
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना संपूर्ण राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीतील खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर आणि महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळ पाहता महायुती तुलनेने मजबूत स्थितीत असल्याचे मानले जात असले, तरी अशा निवडणुकांमध्ये केवळ आकडे निर्णायक ठरत नाहीत, हे मागील निवडणुकांनी दाखवून दिले आहे. कमी संख्याबळ असूनही महाविकास आघाडीने यापूर्वी विजय मिळविला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही डॉ. विवेक नावंदर पुन्हा एकदा राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिका राजकारणाचाही परिणाम..
परभणी महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींचा प्रभाव या निवडणुकीवर दिसून येत आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे २५ नगरसेवक निवडून आले होते. स्वतंत्र सत्ता स्थापनेची संधी असतानाही काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्यावेळी सुशील देशमुख यांच्या कुटुंबीयांना उपमहापौरपदाची संधी देत सत्तेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते.
मात्र, विधान परिषदेची जागा ठाकरे गटाकडे असताना काँग्रेसशी जवळीक असलेल्या सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महाविकास आघाडीतील काही घटकांमध्ये नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे निवडणुकीतील मतविभाजनाच्या शक्यतेवरही राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत.
देशमुखांच्या भूमिकेबाबत चर्चा
राजकीय वर्तुळात सुशील देशमुख यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीनंतर सक्रिय भूमिका न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात असून, त्यामुळे काही मतदारांमध्ये त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याची चर्चा आहे. परिणामी, निवडणुकीतील त्यांची भूमिका नेमकी काय राहणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. तथापि, देशमुख समर्थक मात्र ही उमेदवारी स्वतंत्र राजकीय भूमिका असल्याचा दावा करीत आहेत.
‘नावंदर की खान?’ चर्चेने रंगले राजकारण
मतदानाची तारीख जवळ येत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, पदाधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये ‘नावंदर की खान?’ अशीच चर्चा रंगली आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून मतदारांशी थेट संपर्क साधला जात असून, पाठिंबा मिळविण्यासाठी बैठका, मेळावे आणि वैयक्तिक संपर्क मोहिमांवर भर दिला जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी अंतिम क्षणापर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीचे संख्याबळ आणि महाविकास आघाडीचे संघटनबळ यामधील संघर्षामुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.
‘विकासकामांवर मतदारांचा विश्वास; विजय निश्चित’ – डॉ. विवेक नावंदर
याबाबत प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर म्हणाले, “परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आणि जनतेच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते, तर कामगिरी, संपर्क आणि विश्वासही तेवढाच महत्त्वाचा असतो. मागील निवडणुकीत कमी संख्याबळ असूनही आम्ही विजय मिळविला होता. यंदाही मतदार विकासकामांवर विश्वास ठेवून साथ देतील आणि विजय आमचाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
إرسال تعليق