मागील बारा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर; निनाजी कांडेलकर यांचे नाव पुन्हा चर्चेत
06 जून 2026
हिंगोली | प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवा आणि गरजूंना मदतीचा हात देण्याच्या कार्यामुळे निनाजी कांडेलकर हे नाव मागील बारा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्याची सर्व स्तरांतून दखल घेतली जात आहे.
सामान्य रुग्णालय परिसरात हजारो नागरिकांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत झाली. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळोवेळी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
याशिवाय गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘साई माऊली’च्या माध्यमातून रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरजू रुग्ण व नातेवाईकांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा उपक्रमही सातत्याने राबविला जात आहे.
रुग्णालय परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी वेळोवेळी साफसफाई मोहीम राबविण्यात येते. स्वच्छतेबाबत जनजागृती करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आणि संकटसमयी मदतीसाठी धावून जाण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन पोलीस अधीक्षकांकडून त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
निनाजी कांडेलकर हे रुग्ण कल्याण समितीचे अशासकीय सदस्य म्हणूनही कार्यरत असून, रुग्णांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
मागील बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या सामाजिक कार्यामुळे निनाजी कांडेलकर यांचे नाव आज सामाजिक क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लवकरच त्यांना एका मोठ्या सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याची चर्चा सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे.
त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी महाराष्ट्र 24 न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!
– महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
إرسال تعليق