एमआरआय कार्यान्वित; मात्र तपासण्या मर्यादितच, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
निनाजी कांडेलकर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
05 ऑगस्ट 2026
हिंगोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे ७ कोटी रुपये खर्चून एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या यंत्रणेद्वारे दररोज केवळ मर्यादित रुग्णांचीच तपासणी होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडीलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन सुरू करण्यात आले. या यंत्रणेद्वारे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसह ओपीडीमधील एमआरआय आवश्यक असलेल्या रुग्णांचीही तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज केवळ तीन रुग्णांचीच एमआरआय तपासणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणीनंतर आवश्यकतेनुसार एमआरआयचा सल्ला देतात. मात्र, अशा रुग्णांनाही प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर येण्यास सांगितले जात असल्याचे कांडीलकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब रुग्णांना खासगी एमआरआय केंद्रांमध्ये हजारो रुपये खर्च करून तपासणी करावी लागत असल्याने शासनाच्या खर्चातून उभारलेल्या यंत्रणेचा अपेक्षित लाभ सर्वसामान्यांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ओपीडीमधून एमआरआयसाठी शिफारस करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची वेळेत तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली असून, ही मागणी मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निनाजी कांडीलकर यांनी दिला आहे.
إرسال تعليق