मिशन ऊर्जा’तून हिंगोलीत १० हजार विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; महिला, सायबर व अंमली पदार्थविरोधी सुरक्षेचा जागर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांचा उपक्रम

‘मिशन ऊर्जा’तून हिंगोलीत १० हजार विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; महिला, सायबर व अंमली पदार्थविरोधी सुरक्षेचा जागर
पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा 
यांचा उपक्रम 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
१० ऑगस्ट २०२६ 
हिंगोली : अंमली पदार्थविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि रस्ते सुरक्षा याबाबत विद्यार्थी, पालक व समाजामध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने ‘मिशन ऊर्जा’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित या अभियानांतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
दि. ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्हाभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन चित्रकला, बॅनर मेकिंग, वक्तृत्व, घोषवाक्य, रांगोळी, निबंध तसेच रील्स तयार करण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच सामाजिक सुरक्षेचे संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘१९३०’, ‘११२’ आणि ‘१०९८’चा संदेश जनतेपर्यंत
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये नागरिकांनी १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, आपत्कालीन परिस्थितीत ११२ या पोलीस मदत क्रमांकाचा वापर करावा तसेच बालकांच्या मदतीसाठी १०९८ चाईल्ड हेल्पलाईनची माहिती असावी, याबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले जनजागृती फलक व बॅनर्स घेऊन शाळा-महाविद्यालयांनी विविध जनजागृती रॅलींमध्ये सहभाग नोंदविला आहे.
११ ऑगस्टला ८ ते १० हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगोली शहरात इयत्ता ७ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली व प्रभातफेरी आयोजित करण्यात आली आहे. शहरातील तब्बल ३२ शासकीय व खासगी शाळा तसेच महाविद्यालयांमधील सुमारे ८ हजार ते १० हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत.
सकाळी ९ वाजता बहुविध प्रशाला, जिल्हा परिषद मैदान येथून रॅलीला सुरुवात होऊन संत नामदेव कवायत मैदान येथे तिचा समारोप होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हातातील जनजागृती फलक, बॅनर्स तसेच विविध घोषणांमधून महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी जनजागृती आणि रस्ते सुरक्षेचा संदेश शहरवासीयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ‘मिशन ऊर्जा’चे उद्घाटन
रॅलीनंतर मुख्य कवायत मैदान येथे मा. ना. श्री. नरहरी झिरवळ, मंत्री अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री हिंगोली यांच्या हस्ते ‘मिशन ऊर्जा’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. श्री. रामराव वडकुते, मा. खा. श्री. नागेश पाटील आष्टीकर, मा. आ. श्रीमती प्रज्ञाताई सातव, मा. आ. श्री. तान्हाजीराव मुटकुळे, मा. आ. श्री. संतोष बांगर, मा. आ. श्री. चंद्रकांत नवघरे यांच्यासह मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र; मा. श्री. राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली; मा. श्री. विवेक गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली; मा. श्री. डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली; मा. श्री. विपुल भागवत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि मा. सौ. आसावरी काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘११२’, ‘१९३०’, ‘१०९८’चे देखावे ठरणार आकर्षण
कार्यक्रमादरम्यान सरजुदेवी शाळा, माणिक स्मारक विद्यालय आणि भारती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन क्रमांक ११२, सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ याविषयी सादर करण्यात येणाऱ्या देखाव्याचे ड्रोन चित्रीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत महत्त्वाचे सुरक्षा संदेश पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरणार आहे.
हजारो विद्यार्थी घेणार सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी शपथ
कार्यक्रमाच्या शेवटी मैदानावर उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक तसेच मान्यवरांकडून महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी जनजागृती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील सामूहिक शपथ घेण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मिशन ऊर्जा’च्या माध्यमातून सुरक्षित समाज निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प केला जाणार आहे.
१२ ऑगस्टला शाळांमध्ये पथनाट्य, डॉक्युमेंटरी व पीपीटीद्वारे जनजागृती
बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचे सादरीकरण करून घेण्यात येईल.
यानंतर पोलीस विभागाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी उपाययोजना आणि रस्ते सुरक्षेसंदर्भातील डॉक्युमेंटरी व व्हिडिओ क्लिप्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहेत. तसेच पीपीटीच्या माध्यमातून संबंधित कायदे, सुरक्षा उपाययोजना, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे मार्ग, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि रस्ते सुरक्षेचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरक्षित समाजाचा संदेश
‘मिशन ऊर्जा’चा मुख्य उद्देश केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सुरक्षेचा संदेश पोहोचविणे हा आहे. विविध स्पर्धा, रॅली, पथनाट्य, चित्रफिती, पीपीटी आणि सामूहिक शपथ अशा विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून ‘सुरक्षित महिला – सुरक्षित बालक – सुरक्षित नागरिक – सुरक्षित समाज’ हा संदेश हिंगोली जिल्ह्यात रुजविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे.
पोलीस विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासोबतच सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे धोके, महिला व बालकांची सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم