हिंगोली एमआयडीसीतील उद्योगाला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची भेट‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाकडे वळावे’ — उद्योग उभारणीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

हिंगोली एमआयडीसीतील उद्योगाला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची भेट
‘युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाकडे वळावे’ — उद्योग उभारणीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
१० ऑगस्ट २०२६ 
हिंगोली : हिंगोली एमआयडीसी परिसरातील डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी भेट देऊन उद्योगाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्योगाची उत्पादन प्रक्रिया, उपलब्ध मनुष्यबळ, रोजगारनिर्मिती तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या औद्योगिक संधींची माहिती जाणून घेतली. हिंगोली जिल्ह्यातील युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता उद्योग-व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
हिंगोली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए-१९ येथे कंपनीचे उत्पादन युनिट कार्यरत असून, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बॉडी मॅन्युफॅक्चरिंग, पीएससी पोल मॅन्युफॅक्चरिंग तसेच विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल एम.एस. फॅब्रिकेशन मटेरियल तयार केले जाते. शासनाच्या विविध विभागांची कामे व टेंडर घेऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे काम कंपनीकडून केले जाते.
या उद्योगामध्ये सध्या सुमारे ४० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळत असून, स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात काम सुरू करताना आवश्यक असलेल्या अनेक वस्तू बाहेरील जिल्ह्यांतून आणाव्या लागत होत्या. हिंगोलीमध्ये साधे औद्योगिक साहित्यदेखील सहज उपलब्ध होत नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवरच आवश्यक वस्तूंचे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच उद्देशाने कंपनीने हिंगोली एमआयडीसीमध्ये भूखंड घेऊन स्वतःचा कारखाना उभारला. सुरुवातीला बाहेरून साहित्य मागविण्याची गरज भासत असताना आता त्याच साहित्याची निर्मिती हिंगोलीतच केली जात आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना
मिळण्याबरोबरच वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होत आहे.
स्थानिक गरज ओळखून उद्योग उभारल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केला. हिंगोलीसारख्या जिल्ह्यात युवकांनी स्वतःचा व्यवसाय व उद्योग उभारण्याचे धाडस करणे गरजेचे असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्थानिक पातळीवर उत्पादन करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढणे आवश्यक आहे.
तिघा भावांनी उभारला उद्योगाचा पाया
या कंपनीचे संचालक म्हणून सचिन तुकाराम टापरे, संदीप तुकाराम टापरे आणि सतीश तुकाराम टापरे हे तिघे भाऊ काम पाहत आहेत. कंपनीच्या तांत्रिक कामकाजाची जबाबदारी इंजिनिअर निलेश नरवाडे सांभाळत असून, सुपरवायझर कोंडबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. तसेच सुनील नवले यांच्यासह कामगार वर्ग कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत योगदान देत आहे.
हिंगोली जिल्ह्यातच आवश्यक औद्योगिक साहित्य तयार व्हावे, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आणि जिल्ह्यातील उद्योगांना बळकटी मिळावी, या उद्देशाने कंपनीने उभारलेला हा उपक्रम स्थानिक औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
युवकांनी उद्योगाकडे वळण्याची गरज
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा फायदा घेत युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करावा. स्वतः रोजगार मिळवण्याबरोबरच इतरांसाठीही रोजगार निर्माण करण्याची क्षमता उद्योगात आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात अधिकाधिक लघु व मध्यम उद्योग उभे राहणे ही काळाची गरज आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्या भेटीमुळे स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले असून, प्रशासन आणि स्थानिक उद्योग यांच्यातील समन्वयातून हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم