जि. प . शाळांमध्ये मराठी-इंग्रजी बाराखडीला सुरुवात करणार
हिंगोलीचे सीईओ विवेक गायकवाड यांचा राज्यातील पहिला उपक्रम; सप्टेंबरपासून १२ टेन्सचे प्रशिक्षण
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, ता. १० : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे, भाषेचा पाया भक्कम व्हावा आणि इंग्रजीची भीती दूर व्हावी, या उद्देशाने हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सुरू केलेला ‘मराठी-इंग्रजी बाराखडी’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा करण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत दररोज सकाळी अर्धा तास मराठी-इंग्रजी बाराखडीचा सराव घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठीतील कोणत्याही नावाचे किंवा शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग सहज तयार करता यावे, तसेच इंग्रजी वाचन, शुद्ध उच्चार आणि शब्दसंग्रह वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक वर्गात मराठी-इंग्रजी बाराखडीचे दर्शनी चार्ट लावण्यात आले असून, शिक्षकांकडून नियमित सराव घेतला जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचन, उच्चार आणि स्पेलिंग तयार करण्याच्या क्षमतेत सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेबाबतचा आत्मविश्वासही वाढत आहे.
सप्टेंबरपासून १२ टेन्सचे प्रशिक्षण
बाराखडीच्या सरावानंतर सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना एका इंग्रजी वाक्याचे सर्व १२ Tenses मध्ये रूपांतर करता यावे, यासाठी विशेष अध्यापन आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्याकरण, वाक्यरचना आणि भाषिक कौशल्य अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात ऑक्सफर्ड डिक्शनरी
प्रत्येक विद्यार्थ्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी उपलब्ध करून देण्याचाही महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शिक्षकांना स्वेच्छेने अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला जिल्हाभरातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या हातात शब्दकोश पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
डिक्शनरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन शब्द, त्यांचे अर्थ, योग्य उच्चार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द समजण्यास मदत होणार असून, त्यांच्यात स्वअध्ययनाची सवयही विकसित होण्यास हातभार लागणार आहे.
‘बाराखडी, १२ टेन्स आणि डिक्शनरी’ची त्रिसूत्री
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या इंग्रजी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. बाराखडी, १२ टेन्स आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात डिक्शनरी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भाषेचा पाया मजबूत करून त्यांना स्पर्धेत सक्षम बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
— विवेक गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. हिंगोली
शिक्षण विभागाच्या मते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण, वाक्यरचना, भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत होणार आहे. विशेषतः वसमत आणि औंढा तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात असून, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचन, उच्चार आणि स्पेलिंग तयार करण्याच्या क्षमतेत झालेला बदल शिक्षक व पालकांच्या निदर्शनास येत आहे.
शिक्षक, पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
“जिल्हा परिषद शाळांतील मराठी-इंग्रजी बाराखडी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचन, उच्चार आणि स्पेलिंगमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. विद्यार्थ्यांच्या इंग्रजीचा पाया भक्कम करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक उपक्रम आहे.”
— प्राप्ती देसाई, प्राथमिक शिक्षिका, जि.प. प्राथमिक शाळा, उमरा
“बाराखडी, १२ Tenses आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात ऑक्सफर्ड डिक्शनरी हा उपक्रम विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पाया भक्कम करण्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल.”
— रंगनाथ भोसले, केंद्रप्रमुख, आंबा केंद्र, ता. वसमत
प्रशासकीय कामगिरीनंतर शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेतील शिक्षकांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच अतिरिक्त प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन पूर्ण करून ‘शून्य अतिरिक्त शिक्षक’ असलेल्या महाराष्ट्रातील मोजक्या जिल्ह्यांमध्ये हिंगोलीचा समावेश केला आहे. आता शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देत इंग्रजी सक्षमीकरणाचा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होत आहे.
राज्यभर राबविण्याची मागणी
“आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान ही काळाची गरज आहे. हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार असून, असा उपक्रम राज्यभर राबविला पाहिजे.”
— राजू नवघरे, आमदार, वसमत
‘मराठी-इंग्रजी बाराखडी’, १२ Tenses आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात डिक्शनरी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान सोप्या आणि व्यवहार्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता आहे.
إرسال تعليق