हिंगोलीतील झन्ना-मन्ना जुगार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांचे आदेश
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
१० सप्टेंबर 2026
हिंगोली : शहरातील एनटीसी परिसरातील एका व्यापारी संकुलातील गाळ्यात सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत सुरुवातीला १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींची संख्या २३ वर पोहोचली. या आरोपींमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी विठ्ठल परसराम काळे याचा समावेश असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काळे यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील एनटीसी भागातील एका व्यापारी संकुलामध्ये असलेल्या गाळ्यात झन्ना-मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी नांदेड येथील पथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक हिंगोलीकडे रवाना करण्यात आले.
पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता, अनेकजण पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच वाहने आणि मोबाईल जप्त केले.
या कारवाईत २ लाख १६ हजार २० रुपये रोख, सुमारे १० लाख रुपये किमतीची चारचाकी क्रेटा कार (एमएच ३८ ए.के. ११३०), ४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली आणि १ लाख ९१ हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन असा एकूण १८ लाख ४७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणात सुरुवातीला १८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुढील तपासात आणखी आरोपींची नावे समोर आल्याने आरोपींची संख्या २३ झाली. तपासादरम्यान जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विठ्ठल परसराम काळे याचाही या प्रकरणातील आरोपींमध्ये समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जुगार प्रकरणात आरोपी म्हणून समोर आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. या अहवालाची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी विठ्ठल काळे यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी जारी केले.
निलंबनाच्या कालावधीत काळे यांनी पोलीस मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. संबंधित चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.
या कारवाईमुळे हिंगोली शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, जुगार प्रकरणात पोलीस दलातीलच कर्मचाऱ्याचे नाव आरोपी म्हणून समोर आल्याने पोलीस विभागातही या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, जुगारासारख्या अवैध प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा अशा गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या निलंबनाच्या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा