गणेशोत्सवात हिंगोली ग्रामीण पोलिसांचा सामाजिक उपक्रम
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांचा सहभाग; पोलीस, होमगार्डसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 22 सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड जवान, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना गरजेच्या वेळी तातडीने रक्त उपलब्ध व्हावे तसेच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, या सामाजिक उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये ३५ पोलीस अंमलदार, १० होमगार्ड जवान यांच्यासह पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग होता.
रक्तदानासोबतच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी रक्तदाब व मधुमेह तपासणी, तसेच विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचाही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड जवानांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
शिबिराला पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघ, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भोसले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक मोदे, पोलीस निरीक्षक जमीर नाईक, औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक साखरे, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय पथकाचे विशेष सहकार्य
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने विशेष सहकार्य केले. प्राचार्य डॉ. मुगल, डॉ. जगताप, डॉ. शिंदे, डॉ. शाहरुख शेख, नर्सिंग स्टाफमधील शेळके मॅडम तसेच रक्तपेढीचे डॉ. संदीप सोळंके यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
यावेळी पत्रकार यादव, वाढवे, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, या भावनेतून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. पोलीस दलाच्या या सामाजिक उपक्रमातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला.
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच आरोग्य तपासणी व रक्त संकलनासाठी सहकार्य करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा व पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा