शेतातील वादातून महिलेची साडी व ब्लाउज ओढून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लिंबाळा येथील घटना; महिलेच्या डोक्याला व पायाला मुकामार, जीवे मारण्याचीही धमकी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतातील एका महिलेला शेतातून आणण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना हिंगोली तालुक्यातील लिंबाळा परिसरात घडली. यावेळी एका आरोपीने महिलेची साडी ओढून तिला गावात फिरविण्याची धमकी दिली. तसेच तिच्या ब्लाउजला हात घालून ओढल्याने ब्लाउज फाटल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध वासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका ४०, वर्षीय रा. लिंबाळा, ता. जि. हिंगोली) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लिंबाळा येथील शेतशिवारात वाघामायच्या वरील अशोकच्या कोपऱ्याजवळ ही घटना घडली.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी धम्मपाल भीमराव कांबळे याने महिलेला शेतातून एका वृद्ध महिलेला घेऊन येण्यास सांगितले. तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वाईट हेतूने फिर्यादीची साडी ओढून, तुला असेच गावात फिरवतो, असे म्हटल्याचा आरोप आहे. यावेळी महिलेने प्रतिकार केला असता ती खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला व पायाला मुकामार लागला.
त्यानंतर आरोपीने पुन्हा फिर्यादीच्या ब्लाउजला धरून ओढल्याने ब्लाउज फाटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी दिपाली धम्मपाल कांबळे व भागवत भीमराव कांबळे हे घटनास्थळी आले. त्यांनीही फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिन्ही आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी वासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार भडके यांच्याकडे तपास
या गुन्ह्याची नोंद २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.१३ वाजता करण्यात आली. वैद्यकीय तपासणीचा अहवाल व जबाब पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. पोले यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भडके करीत आहेत. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिलेशी गैरवर्तन, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू आहे.
إرسال تعليق