हिंगोली . लातूर गुन्हे शाखेच्या पथकावर पळशीत जीवघेणा हल्ला!
लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी पोलिसांना मारहाण; डोळ्यांत मिरचीपूड टाकून शासकीय वाहनाची तोडफोड
वसमत तालुक्यातील पळशी येथील घटना; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके रवाना
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 ऑक्टोबर 2026
हिंगोली : लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी वसमत तालुक्यातील पळशी येथे आलेल्या लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावर आरोपींच्या नातेवाईकांसह काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. हल्लेखोरांनी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच शासकीय वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेसाठी दोन पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात वसमत तालुक्यातील पळशी येथील राजू मोहन शिंदे याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पळशी येथे दाखल झाले होते.
घरफोडीतील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाने कारवाई सुरू केली असता, पहाटेच्या सुमारास पोलिस आल्याची माहिती मिळताच काही जणांनी अचानक पथकावर हल्ला चढविला. हल्लेखोरांनी हातातील लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले. तसेच पोलिस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.
हल्लेखोरांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांना प्रतिकार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता शासकीय पोलिस वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या तोडफोडीत शासकीय वाहनाचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हट्टा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांच्यासह जमादार कृष्णा चव्हाण, शिवा पतंगे, अविनाश राठोड, गणेश सूर्यवंशी, संदीप चव्हाण आणि भारशंकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांनी २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी हट्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विक्की मोहन शिंदे, सुदर्शन मोहन शिंदे, सचिन मोहन शिंदे, राजू मोहन शिंदे यांच्यासह पळशी येथील इतर तीन ते चार महिला व पुरुष अशा एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके तैनात
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावरच हल्ला झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे आणि शासकीय वाहनाची तोडफोड करणे अशा गंभीर बाबींचा या प्रकरणात समावेश आहे. गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तैनात केली असून, पुढील तपास हट्टा पोलिसांकडून सुरू आहे.
إرسال تعليق