जीएसटी कार्यालयाच्या अधीक्षकास दहा हजाराची लाच घेताना पकडले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 नोव्हेंबर 2024
हिंगोली : जीएसटी कार्यालयातील
अधीक्षक मनोज मधुकर मगरे यांना १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी रंगेहाथ पकडले असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
यासंदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे रीतसर तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदाराच्या नावे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे. कंपनीच्या व्यवसायासाठी त्यांनी जीएसटी रजिस्ट्रेशन क्रमांकही घेतला आहे. मात्र सहा महिन्यांपासून जीएसटी रिटर्न दाखल केले नसल्याने जीएसटी कार्यालयातून कंपनीचा परवाना का रद्द करू नये, या संदर्भात ७ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. तसेच ४ नोव्हेंबर रोजी कार्यालयात हजर राहण्याचे कळविले
होते. या नोटिशीनंतर ५ नोव्हेंबर रोजी तक्रारदारांनी जीएसटी कार्यालयातील अधीक्षक मनोज मगरे यांना फोनवर संपर्क साधला. तेव्हा तुमच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचे नसेल तर हिंगोली येथे जीएसटी कार्यालयात येऊन भेटा, असे त्यांनी तक्रारदारास कळविले. त्यानंतर तक्रारदाराने ऑनलाइन जीएसटी रिटर्न भरून त्यावरील दंडाची रक्कमही भरून घेतली. या प्रक्रियेनंतर जीएसटी रिटर्न भरल्याबाबत व ७ ऑक्टोबर रोजीची नोटीस कॅन्सल केल्याबाबत जीएसटी कार्यालयाकडून सिस्टीम जनरेटेड ऑर्डरही प्राप्त झाली. त्यामुळे तक्रारदार जीएसटी कार्यालयात मनोज मगर यांना भेटण्यासाठी गेले नाहीत.
२२ नोव्हेंबर रोजी जीएसटी कार्यालयातून मनोज मगरे यांनी तक्रारदाराला फोन केला, तुम्ही मला
भेटायला आले नाहीत. मी तुमच्या कंपनीचे जीएसटी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठविले नाही, असे म्हणून तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही तक्रार एसीबी कार्यालयात दाखल झाल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी पाठविले नसल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना २५ नोव्हेंबर रोजी जीएसटी कार्यालयाचे अधीक्षक मनोज मधुकर मगरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
या कारवाईने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे
إرسال تعليق