औंढा पोलीस निरीक्षकपदी शामकुमार डोंगरे यांचा पदभार; गावगुंडांना तडीपार करण्याचा इशारा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ, दि. ५ जून – औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी गुरुवार, दि. ५ जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करत, पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता भंग करणाऱ्या व वारंवार वाद निर्माण करणाऱ्या गावगुंडांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक डोंगरे म्हणाले की, औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही समाजकंटक व गावगुंड सातत्याने वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवत आहेत. अशा व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
पोलीस निरीक्षक डोंगरे यांची यापूर्वी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. त्या काळात त्यांनी अनेक गावगुंडांवर प्रभावी कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांची ओळख कर्तव्यदक्ष आणि कठोर प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे.
दरम्यान, औंढा नागनाथ येथे रुजू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांची बदली झाल्याने त्यांचाही सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.
पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला पोलीस विभागातील उपनिरीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औंढा नागनाथ परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.
إرسال تعليق