हिंगोलीत तलाठ्यावर लाचलुचपत विरोधी पथकाची धडक कारवाई – १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ५ जून – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात लाचलुचपत विरोधी विभागाने आज मोठी सापळा कारवाई करत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रामेश्वर अर्जुन रोडगे (वय ४३) यांना १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार हा २५ वर्षीय युवक असून तो खिल्लार (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील रहिवासी आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित ५ एकर शेती हक्कसोड वाटणीद्वारे मिळालेली असून, त्या जमिनीचा फेरफार करून ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी संबंधित तलाठीने २२ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीनुसार, आरोपी तलाठीने २ जून २०२६ रोजी तक्रारदाराकडून २२ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ८ हजार रुपये आधीच घेतले असून, उर्वरित १४ हजार रुपये दिल्याशिवाय काम पूर्ण करणार नसल्याचे सांगितले होते.
लाच मागणीची पडताळणी करण्यासाठी ५ जून रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. सेनगाव येथे झालेल्या पडताळणीत आरोपीने पूर्वी ८ हजार रुपये घेतल्याची कबुली देत उर्वरित १४ हजार रुपयांची मागणी केली व ती रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शवली.
यानंतर हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात सापळा कारवाई करण्यात आली. पंचांच्या उपस्थितीत आरोपी तलाठ्याने तक्रारदाराकडून १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले.
आरोपीच्या अंगझडतीत आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, एसबीआय बँकेचे दोन एटीएम कार्ड, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल व ६,७५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मोबाईलची तपासणी करून आवश्यकतेनुसार जप्तीची प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु (लाचलुचपत प्रतिबंध विभाग, हिंगोली) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुलभा राऊत करत आहेत.
कारवाईत
विजय शुक्ला युनुस शेख, भागवाण मंडलीक, राजाराम फुपाटे, रवि वरणे, अमोल जाधव, गोविंद शिंदे, गजानण पवार, शिवाजी वाध
यांनी सहभाग घेतला होता
या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
إرسال تعليق